Monday, January 9, 2017


कलावंतीन ट्रेकची टीम

      आयुष्यात प्रत्येक व्यक्ती नविन संधीची वाट बघत असते,....... तसच आम्हा ट्रेकर्सच......

      कळसुबाई ट्रेक झाल्यावर कलावंतीन ट्रेकचे वेध लागले होतेच. परंतु या वेळी मी मागच्या दोन ट्रेक्सच्या अनुभवातुन शिकलेल्या गोष्टी या ट्रेकच्या वेळी टाळणार होतो व काही अंमलात आणणार होतो. 
      कळसुबाई ट्रेक मध्ये माझे दोन्ही पायांचे गुडघे अचानक लॉक झाल्याने मला खुपच वेदनांना सामोरे जायला लागले होते.  आता परत कलावंतीन..... गुगलवर फोटो पाहील्यावर उरात धडकी भरली ती चालण्याच्या त्रासातुन मला होणा-या वेदनांची.  वयानुसार हे त्रास जरा लवकरच जाणवु लागले होते.  पुर्वीची जुनी माणसे अगदी 90 ते 100 वर्षांपर्यंत जगत असत त्यांना कोणत्याही व्याधी नव्हत्या माझ्या वयाच्या पिढी मध्ये या व्याधी लवकरच सुरू झाल्य़ाचे आढळते.  परंतु आपण मनाने खंबीर व इराद्यांचे पक्के असु तर कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो हे माझ कायमच मत.  मग काय गुडघे दुखीवर एकच उपाय की, रोजचा व्यायाम... तो मात्र या ट्रेकमध्ये यशस्वी ठरला....
      जिद्दीच्या ट्रेकची वैशिष्टे,.........शिस्तबध्द ट्रेकींग पण मजा-मस्तीत, व्यवस्थीत व्यवस्थापन, सुरक्षीतता, महिला व मुलींना सुध्दा अगदी सुरक्षीत ग्रुप ...यामुळे दिवसें दिवस ट्रेकर्सची वाढ होणार हे निश्चित होत.  त्यानुसार जवळ-जवळ कलावंतीन साठी 43 जणांचा ग्रुप तयार झाला. यातील 30 जण तर नेहमीचेच ग्रुप मेंबर होते.  शक्यतो सहजा सहजी अडचणींशीवाय कंटाळा आला म्हणुन कोणही पुढील ट्रेक चुकवत नव्हता. उलट जे ट्रेकला आले नाहीत त्यांना चुकल्या- चुकल्या सारखच वाटत होत.
      कलावंतीन ट्रेकला जेष्ठ नागरीकत्वाकडे झुकलेल्या व्यक्ती मात्र आवर्जुन येताना व त्यात वाढ होताना दिसली.  प्राथमिक शाळांमधुन नवीन पिढी घडवणा-या महिला शिक्षकांची ट्रेकींग साठी वाढ झालेली आढळली.
      ट्रेकच्या आदी नेहमी प्रमाणे जिद्दीने येणा-या ट्रेकर्सची मिटींग घेऊन त्यांना सर्व सुचना देण्यात आल्या.  मी व्हॉट्स अप हे अप्लीकेशन तयार करणा-यांना खरच मनापासुन धन्यवाद देउ इच्छितो.  यामुळे आपण एकमेकांच्या कीती जवळ आलो.  नात्यांना एक नवीन दिशा मिळाली. याच मुळे जिद्दीचा एक ग्रुप तयार झाल्याने त्यावर ट्रेक संदर्भात संवाद...शंका... उत्तरे शोधण्याला मदत झाली.  त्यामुळे आम्हाला ट्रेकच्या आदी एकमेकांना संपर्क साधणे सोपे गेले.
      ट्रेकचा दिवस ठरला... 25/09/2016..... हि तारीख 4 ते 5 महिने आदीच ठरलेली होती.  तारीख ठरवताना या महिन्यात, महिना अखेर शक्यतो पाऊस नसल्याने तारीख ठरवण्यात आली होती.  त्या नुसार रेल्वेचे सगळ्यांचे आरक्षण.. व इतर गोष्ठी ठरल्या होत्या.  परंतू जाण्याच्या आदी 8 दिवस पावसाने जो काय जोर धरला, जणू जुलै महिनाच सुरू असल्याचा भास होत होता.  25 तारखेच्या आदी 3 दिवस तर अतिशय मोठा आणी दिवसभर पाऊस पडत असल्याने अनेक ट्रेकर्सच्या घरातुन ट्रेकला जाण्यासाठी नकारघंटाच ऐकू येत होती.  मी तसा पाऊस, वारा,वीजा यांना न भिणारा... घरातील देखील जरा चिंतेतच होते.  पण जाण्याचा ठाम निर्धार... मग काही होवो... मध्येच अडकुन पडलो तरी चालेल... अशी वेळ आलीच तर त्याचाही अनुभव घ्यायचा.... नाहीतर ठरवुन असा अनुभव कधी कोण घेउ शकतो का.... त्यामुळे जाण्याच पक्क होत.  परंतु चालुच वर्षी इतर ट्रेकर्स च्या बाबतीत घडलेल्या दुर्घटना वाचनात आलेल्या........ सतत डोक्यात ठाण मांडून बसलेल्या होत्या.  शक्यतो माझ अस मागे-पुढे कधीच होत नाही.  परंतु या वेळी सततचा पडणारा पाऊस पाहून मन निर्णय घेण्यास तयार नव्हत... परंतु ग्रुप मधील इतरांचा उत्साह पाहून व स्वत:वरचा स्वत:चा विश्वास व जिद्दी ग्रुपची ट्रेक यशस्वी करण्याची पध्दत पहाता जाणे नक्की झाले.  परंतू आदल्या दिवशी अतिशय पाऊस पडत होता.. त्यात कोकण रेल्वे रूळांवर कोकण रेल्वेच्या इतिहासात प्रथमच पाणी साठल्याच्या बातम्या... ट्रेन 3 ते चार तास लेट.... काही स्थानकांतच थांबवलेल्या..... जिद्दीच्या धिरजला फोन केला .... तो पण य़ाच काळजीत होता.  त्याने प्रथम कलावंतीन येथील परिस्थितीचा आढावा घेतला... तिकडे पाऊस कमी असल्याच कळल्यावर थोडा जिवात-जिव आला... आम्ही जाण्याच्या दिवशी ट्रेन वेळेवर जात होत्या.
      नेहमी प्रमाणे सर्व ट्रेकर्स रत्नागिरी रेल्वे स्टेशनला एकत्र जमले. रात्री 10 ची ट्रेन... वेळेवर सुटली... ट्रेन मध्ये सर्वच एकाच डब्यात असल्याने..... मग काय धमाल मस्ती.... फोटो...सकाळी 4 वा. आम्ही सर्व पनवेलला पोहोचलो.  या वेळी माझ्या कंपनीतुन ओंकार मुळे आला होता...शक्ती नागवेकर पनवेलला येणार होता. 
     
रेल्वेस्टेशन ला
पनवेलला आल्यावर सर्व फ्रेश होउन एस.टी.ने आम्ही कलावंतीन कडे प्रयाण करणार होतो. गाडी 5 ची... फलाटावर आली 5.30 वा. .....गाडीत एवढी गर्दी,...... कदाचीत कंडक्टर पहिल्यांदाच पहात असावा... कारण पनवेल-ठाकुरवाडी गाडी... ठाकुरुवाडी शेवटचा थांबा.... आम्ही पण शेवटच्या थांब्यावर उतरणारे...आणी सकाळीच एवढी गर्दी.... आज त्याची भवानी चांगली झाली...

      सकाळी 6 वाजता आम्ही ठाकुरवाडी गावात पोहोचलो. मग लगेचच 3 रांगांमध्ये ट्रेकर्स कलावंतीनला जाण्यासाठी तयार...


शिवाजी महाराज्यांच्या मोठ्या घोषणा.....आम्ही सर्व पक्के मावळे शोभू.... घोषणांनी सारा आसमंत दणाणुन गेला..... अख्खा गाव जागा झाला असेल.... अंधुक पहाट....निळे आकाश...... सह्याद्रीच्या डोंगरांच्या उंचच्या उंच रांगा.... डोंगरातुन वहाणारे छोटे मोठे धबधबे... धुक्यांची चादर पांघरलेले ठाकुर गाव.... यातुनच आम्ही चालायला सुरूवात केली.  इथे 1 ते 2 कि.मी. डांबरी पण खराब झालेला रस्ता... परंतु त्यात सुध्दा पहिल्याच अर्धा कि.मी. मध्ये दमछाक करणारी चढण... नंतर कायम डोंगरातुन चढणीचा भाग.......


      पोटात कावळ्यांनी आपले अस्तित्व दाखवायला सुरवात केली होती..... आता नाष्टा कुढे,केव्हा...? प्रत्येकाला हाच प्रश्न पडलेला.   हा भाग आदिवासी पाड्यात मोडतो.  डोंगराळ भाग....डोंगराळ म्हणजे साधे डोंगर नव्हेत अगदी कड्या कपारींचा भाग.
1 तासभर चालल्यावर नाष्टा करण्याची सोय ..... नाष्टा म्हणजे याच डोंगराळ भागात असलेल्या छोट्याश्या पाड्यातील एका घरात दुपारचे जेवण आणी नाष्टा याची सोय करण्यात आली होती.  परंतू सदर ठिकाण खुपच लांब होत जवळ-जवळ 2 तासाचे अंतर.  मग जिद्दीच्या मेंबरने त्यांनी केलेला नाष्टा... कांदापोहे घेऊन त्यांनाच उलट खाली यायला सांगितलं.... तो वरून खाली निघाला आणी आम्ही खालून वर ... मध्येच वाटेतच थांबून आम्ही नाष्टा केला.... त्याने एक टोप भरून कांदे पोहे आणले होते..... वाटेतच खाताना अशा प्रकारे नाष्टा करण्याचा अनोखा आनंद सगळ्या ट्रेकर्सना घेता आला.
   

प्रत्येक ट्रेक मध्ये आम्हाला एक तरी कुत्रा साथ देतोच...


     
 आम्ही धुक्याने पांघरलेल्या डोंगरातुन चालत होतो... अतिशय अल्हाददायक वातावरण... पक्षांची कीलबील अधुन मधुन कानावर एकू येत होती.... त्यातच उंच कडे... त्यातुन पडणारे धबधबे.... दृष्टीस पडत होते....

      अनेक जण आपापल्या मोबाईल मध्ये प्रत्येक्ष क्षण टिपत होते.   काही या सुंदर ठिकाणी आपले फोटो काढून घेताना दिसत होते. परंतु 1 तासाची अवघड चढण चढुन सुध्दा आम्हाला त्या कलावंतीनच दर्शन काही झाल नाही.  कांदापोहे घेऊन आलेला मुलगा आमच्या बरोबर पुन्हा येण्यास निघाला तेव्हा आम्ही त्याला सारखे विचारायचे की तुझ घर अजुन कीती लांब आहे.... तो सांगायचा आर्धा तास लागेल.... तो त्याचा आर्धातास होता.... म्हणजे आमचा 1 तास......... बापरे अजुन 1 तास चालायच..... आम्हाला वाटल 1 तासानी कलावंती येईल परंतु 1 तास चालल्यावर छोटासा पाडा (गावातील घरांचा समुह) लागला.  हा कलावंतीन गडाच्या पायथ्याशी आहे पायथ्याशी याचा अर्थ अगदी जवळ नव्हे तर इथुन कलावंतीन दिसतो तरी...
      मी कलावंती उतरून परत जेव्हा या पाड्यावर आलो, तेव्हा लक्षात आल की ही जागा काही लोकवस्ती करण्याची किंवा गाव वसवण्या सारखी नाही.  जेम-तेम 10-12 घर.  मग ही लोक कशी आणी कशाला आली इथे.? माझ्या कल्पने प्रमाणे जेव्हा कलावंतीनच्या काळ्या दगडात पाय-या कोरल्या गेल्या तेव्हा त्या कोरण्यासाठी आलेल्या मजुर व इतर लोकांनी रहाण्यासाठी त्या काळी या जागेचा उपयोग केला असावा.  इथुन हे लोक रोज त्या कलावंतीनीला आपल्या हातांनी आकार द्यायला ( पाय-या तयार करायला ) जात असावेत.  त्या नंतर  ते याच ठिकाणी राहीले असावेत व ही आजची त्यांची पिढी असावी........ या माझ्या म्हणण्याला कोणताही विश्वसनीय इतिहासात पुरावा नाही किंवा तो शोधावा लागेल.


चालताना ज्या ठिकाणाहून कलांवतीन च दर्शन झाल.  त्या ठिकाणी काही ट्रेकर्स रात्रीचे टेंट मध्ये राहीलेले होते...

      आम्ही दल-मजल करत त्या छोट्याश्या घराच्या समुहात दाखल झालो.  जेमतेम 10 ते 15 घर, दाटीवाटीनी उभी.... जिद्दीने याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली होती.  त्या ठिकाणी सगळ्यांनी आपापल्या सॅक ठेवल्या.... सर्व फ्रेश झाले आणी कलावंतीनीच्या ख-या चढाई साठी सज्ज..... एवढ्यात....क्षणात वातावरण बदलले.... डोळ्याची पापणी लवते ना लवते इतक्यातच ढग जमा झाले ...... पावसाला सुरवात..... असा क्षणात होणारा बदल मी माझ्या आयुष्यात प्रथमच पहात होतो.... आपण नेहमी आपापल्या गावी शहरात पावसाची सुरूवात पहातो..... परंतु क्षणातील बदल याच ठिकाणी पाहू शकता....


      आता प्रश्न पडला कलावंतीनीच्या आजू-बाजूचा निसर्ग कसा पहायचा.  कारण पाऊस,धुक यामुळे इतर परिसर दिसणे शक्य नव्हते...... मी, पाऊस आल्याने रेनकोट घालण्याचा निर्णय घेतला... काहींनी भिजतच चालण्याचा निर्णय घेतला..... बरोबर काहीही न्यायचे नव्हते.  कारण बॅगा सांभाळुन चढाई अशक्यच होती.. ... त्यातच कलावंतीनीचा पहिला खडकातील चढाईचा पॅच अत्यंत कठीण व प्रचंड बुळबुळीत घसरणीचा...
      आम्ही पाड्यातील घर सोडून आता अतीशय कठीण डोंगरातील चढाईला सुरवात केली.  वाट नाहीच.... जिथुन पावसाचे पाणी वाहत खाली येते त्याने तयार झालेली वाट..... त्यातुनच चालायचे..... पाऊस पडत असल्याने मोबाईलला प्लॅस्टीक कव्हरने झाकुन त्यातुन काढलेले फोटो....
       या अवघड चढाईत खुप दमछाक होत होती...... परंतु मी कळसुबाई ट्रेकच्या अनुभवातुन माझा फिटनेस रोजच्या रोज मेंन्टेन केला होता.  त्यामुळे मला या वेळी या ट्रेकचा कसलाच त्रास झाला नाही. चढाईत वाटेत दगडात कोरलेली गणपतीची आणी हनुमानाची मुर्ती आढळते.... तीला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो..
      आम्ही या जंगलातुन वाट काढत काढत एकदा कलावंतीन च्या पायथ्याशी येउन पोहोचलो..... जरा चढण्याचा मार्ग पाहीला.... पहिल्या टप्प्यात कोणतीही पायरी नाही की कोणताही आधार नाही.  एका बाजुला उंच कलावंतीनीची भक्कम बाजू तर एका बाजूखोल दरी..... आम्ही पायथ्याशी जीथे उभे होतो त्याच्या कडेलाच प्रबळगड.... इतिहासकार म्हणतात की शिवाजी महाराज्यांनी जर रायगडला आपली राजधानी केली नसती तर त्यांनी प्रबळगडला आपली राजधानी केली असती.  कलावंतीन हा प्रबळ गडाचा टेहाळणी बुरूज..... परंतू तो बुरूज वैगेरे नाही हा..... तो एक गडच म्हणा ना.... प्रबळ गडाला मुरंजन असे देखील नाव आहे.

      कलावंतीनचा उल्लेख व इतर माहीती मी शोधण्याचा फार प्रयत्न केला परंतु ठोस अशी माहीती मला मिळालीच नाही.

कलावंतीन चढाईचा पहीला टप्पा.... जिद्दीचे मेंबर एक एक करून थोड्या थोड्या अंतरावर उभे राहीले....... कोणताही धरायला आधार नाही.... पायाखाली अत्यंत बुळबुळीत घसरण ......... पाय ठेवतानाच एकदाच भक्कम रोवायचा.... गडाच्या बाजूला आपण झुकायच आणि वाकत वाकत चढायच..... दुस-या बाजूला खोल दरी असल्याने त्या बाजूला तोल जाऊन चालणारच नाही..... मग आधी 18 जणांच्या एका बॅचला वरती नेउन सोडायच ठरल.

  त्याप्रमाणे जिद्दीच्या मेंबरनी एक बॅच वर नेउन सोडून पुन्हा ते खाली राहिलेल्यांना नेण्यासाठी आले.  ..... आम्ही शेवटी..... पहिल्या बॅचला सोडून येण्याला आर्धा तास लागला तोपर्यंत इथे असणा-या छोट्याश्या टपरीत गरम-गरम आल्याचा चहा घेतला.... टपरीत एक लहान 5 वी तील मुलगी आणी तीची आई.... मग चौकशी सुरू... त्या छोट्य़ाश्या टपरीत त्य़ा शनिवार आणी रविवारीच येतात.... एका बिस्किट पुड्यामागे जेम तेम 2 रू. सुटत असतील... परंतु त्य़ासाठी त्या एवढा डोंगर चडून येतात..... कुटुंबासाठी कष्ट घेणे हे काय असत ते मी पहात होतो..........आणी लहान पणापासुनच कष्टाच बाळकडू त्या चिमुरड्या मुलीला मिळत.... या गोष्टी आमच्या ग्रुप मधल्या किती तरूणांनी शिकल्या असतील व त्यांना त्या उमगल्या ते देवच जाणे.... प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टीकोन काय आहे त्यावर अवलंबुन आहे.... मी मात्र तीचा चहा संपावा या एकाच उद्देशातुन इतरांना चहा हवा का विचारत होतो... त्याचा फायदाही झाला आम्ही तिने केलेला चहा संपवला..... काही बिस्कीट पुडे घेतले.... तेवढाच त्यांच्या कुटुंबाला हातभार लागला.... हा परिच्छेद जे-जे ट्रेकर्स वाचतील त्यांना माझी विनंती की अशा ठिकाणी जरी एखाद्या वस्तुची गरज नसली तरी ती तुम्ही जरूर घ्या कारण आपल्या शिवाय तिथे कोण जाणार.... तेवढाच त्यांना हातभार.....

      पहिली बॅच जसजशी वर चढत होती.... तेव्हा त्यांची होणारी कसरत आम्ही पहात होतो...
पहिला कसलाही आधार न घेता चढायचा पॅच संपल्यावर काळ्या दगडात कोरलेल्या पाय-या..... इथे मला हरीहर गडाची आठवण झाली. हरीहर गडावर अश्याच काळ्या दगडात कोरलेल्या पाय-या चढून जावे लागते.  परंतु तिथे प्रत्येक पायरीच्या वर, वरच्या पायरीला हाथाने पकडायला दोन्ही बाजूला खोल खड्डा (खोबण) केलेली होती.  इथे मात्र अस काहीही नाही..... पाय-या जास्त रूंद देखील नाहीत... 24 तास पाऊस पडल्याने प्रचंड पाणी जाऊन खुप शेवाळ धरल्याने पाय-या प्रचंड बुळबुळीत..... जरा पाय चुकला की.......500 ते 1000 फुट खोल दरीतच....
 पहिल्या ग्रुपला वर सोडून आल्यावर आम्ही वर निघालो... चढाई करताना फोटो काढणे शक्य नसल्याने उतरताना फोटो काढण्याचे मी ठरवले.

      पुर्ण चढाई करून आम्ही कलावंतीन च्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो.  आता फक्त 20 फुटाचा शेवटचा टप्पा..... अत्यंत अवघड....आणी म्हटला तर सोपा.....

      यावर एक-एक करून सर्वांनी चढायला सुरवात केली.... मला प्रश्न पडला जेष्ठ नागरीकत्वाकडे निघालेल्यांचा..... परंतु जिद्दीच्या टिमने सर्वांना वरपर्यंत नेण्याचा जणू पणच केला होता.... टिम मेंबर एका - एका ठिकाणी उभे राहीले.  हातांचा आधार देत. चढणे.... वर चढताना आपण कोठे पाय ठेवायचा ते आपणाला दिसत नव्हते... मग जिद्दीचा मेंबरच प्रत्येकाचे पाय धरून योग्य त्या ठिकाणी ठेवत होते.... जिद्दीच्या मेंबरचा एक महत्वाचा गुण या ठिकाणी दिसला म्हणजे ज्या ठिकाणी पाय ठेवायला जागा नसेल त्या ठिकाणी ते आपल्या स्वत:च्या हातावर पाय ठेऊन वर जायला सांगत होते....... केवढी ती खात्री..... तशी अडचण नको म्हणुन सुरक्षीततेच्या दृष्टीने टिमने रोप आणला होता.  तो वरच्या टोकाला एका मोठ्या दगडाला गोल बांधुन खाली सोडलेला होता.  मी वर जाऊन वरून फोटो काढत होतो.  काही क्षण मला सुंदर टिपता आले... अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात लक्षात रहाण्या सारखे..... जेष्ठ लोकांना जिद्दीच्या टिमने त्यांना दोर बांधुन वर आणले.... अशा त्या दोघांच्याही जिद्दीला सलाम...

      वर चढुन आल्य़ावर आदी भुकेची काळजी... अगदी आधाश्या सारखे सगळे असेल त्यावर तुटून पडले...... नंतर फोटोग्राफी..... शिवाजी महाराजांच्या घोषणा.... कलावंतीन च्या समोरच दिसतो तो प्रबळगड.... अगदी इकडून हाक मारली की तिकडे आवाज पोहोचतो..... पलीकडची माणसे स्पष्ट दिसतातही.... परंतु त्यांनी प्रबळ गडावरून कलावंतीन वर यायच ठरवल तर 1 ते दिड दिवस लागेल ..... पलीकडच्या प्रबळ गडावरील ट्रेकर्स नी शिवाजी महाराजकी....... अशी घोषणा दिल्यावर आम्ही इकडून जय..... अस म्हणत होतो... अस पाच मिनीटे घोषणांमध्ये गेली.... येथुन निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला..... डोळ्यांमध्ये निसर्गाची ति देणगी साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो...... परत निघताना, येथुन निघुच नये अस वाटत होत....

      परतीचा प्रवास............ चहाच्या टपरी पर्यंत उतरणे अगदी चढण्या पेक्षा अत्यंत कठीण..... परंतु प्रत्येकाने अत्यंत सावधपणे व दिलेल्या सुचना तंतोतंत पाळत सर्व सुखरूप कलावंतीन चा निरोप घेऊन परत आले.... आल्यावर पाड्यावर दुपारचे जेवण...................... तरी दुपारचे 3 वाजले होते.....एस.टी. स्टॉप हा गावात असल्याने 1 ते 2 तास चालायला लागणार होते.... जेवढ्यांचे जेवून झाले त्यांनी निघायचा निर्णय झाल्याबरोबर मी पटापट निघालो.... येताना मी एकटाच होतो..... शेवटी एस.टी. चुकलीच.... मग 7 च्या एस.टी. ने पनवेल... रात्रीच जेवण....आणी परतीचा प्रवास....
जिद्दीमुळे आयुष्यात चांगली ठिकाण पहायला मिळाली... निसर्गाची किमया अनुभवता आली......

आता वेध......... प्रबळगडाचे व पुढच्या ट्रेकचे........